English SiteMap


व्रतस्थ दानायोगिनी कै. पुष्पलता रानडे


         
कीर्तन संजीवनी उपाधीने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या पुष्पलताबाई रानडे यांचे ११ सप्टेंबर २०१० रोजी निधन झाले. गायनाच्या अंगाने कीर्तन श्रवणीय करणाऱ्या त्या एक लोकप्रिय कीर्तनकार होत्या. कीर्तन कला क्षेत्रातील ते एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते. हैद्राबादच्या लेले कुटुंबातून वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पुण्यातील खानदानी रानडे कुटुंबात आल्यावर जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी पुण्यभूमीत आपल्या पुण्याकार्याचा मोठा ठसा उमटविला.

           आई ती. लक्ष्मीबाई लेले व मावशी सुप्रसिध्द लेखिका ती.कमलबाई टिळक यांच्याकडून पुष्पलताबाई ना लेखन व कीर्तन कलेचा वारसा मिळाला होता. पण पुण्यात आल्यावर त्यांनी लौकिक शिक्षणाबरोबरच संगीत आणि नृत्यांचे शिक्षण घेतले, त्याचा त्यांना कीर्तनकलेसाठी उपयोग झाला. त्याच बरोबर शिवन, ग्रंथपालन, साहित्यविशारद, हिंदी कोविद, मोंटेसरी, आदी पदव्याही त्यांनी संपादन केल्या.

            महाराष्ट्र कलोपासक संस्थेत श्री.पु.ल.देशपांडे, प्रभुदास भूपटकर, सेवा चौहान, भगवान पंडित, के. नारायण काळे, यांसारख्या मातब्बरकलाकारांसोबत रंगमंचावरील भूमिकाही त्यांनी गाजवल्या. प.लं. च्या "वय मोठ खोट" या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

           सारे व्यवस्थित चालले असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांना व पती श्री.राजाभाऊ रानडे ह्याना फार मोठ्या आर्थिक व सामाजिक आघातांना सामोरे जावे लागले. पण कीर्तनानेच त्यांना संकटकाळी आणि आर्थिक ओढग्रस्थ परिस्थितीत आधार दिला. जगण्याची धडपड, हिम्मत, वकृत्व, कर्तबगारी, विशेष गुणवत्ता, व ह्या सर्वांच्या जोडीला ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांवरील असीम श्रद्धा ह्यांच्या जोरावर त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. त्याही परिस्थितीत कीर्तनाचे सर्व उत्पन्न त्यांनी फक्त सामाजिक कार्यावरच खर्च केले व प्रापंचिक खर्च साठी पती राजाभौंच्या मदतीने स्वत:च्या घरात लक्ष्मीरोडवर 'संजीवन' नावाचे लॉजसुरु केले.

            पन्नास वर्षांच्या काळात हजारो कीर्तन करून लाखो रुपयांच्या देणग्या त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संस्थाना उभारणीसाठी व संवर्धनासाठी दिल्या. नव्वद वर्षांचे कृथार्त जीवन त्या जागल्या. लेखिका, कवयित्री, कीर्तनकार, म्हणून, त्या उभ्या महाराष्ट्राला परिचित झाल्या. जगदगुरू शंकराच्यार्यानी आदर्श कीर्तनकार म्हणून त्यांचा गौरव केला. गोवा कला आकादमी तर्फे "कीर्तन संजीवनी" उपाधी त्यांना देण्यात आली, तसेच अनेक मन सन्मान त्यांना लाभले.  

           पण कर्तृत्व, वकृत्व ह्यांबरोबरच पुष्पलताबाई जनमानसात मान्यता पावल्या त्या त्यांच्या सहज दातृत्वा मुळे. धनसंचायाचा समाज ऋणाच्या भावनेतून उत्तम विनियोग त्यांनी केला. आपले पती राजाभाऊ रानडे यांच्या निधनानंतर सर्व सामान्य स्त्री प्रमाणे हताश होऊन न बसता स्थावर आणि जंगमाची योग्य निर्वा निवर करून त्या धनाचा समाजातील धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थासाठी सदुपयोग करण्याचे व्रताच त्यांनी घेतले, आपल्या आईची.

बुड्त्यासी हात द्यावा, घाबरल्या धीर, ताल गीताला |
तृशितासी जल, क्षुधीतासी  अन्न, अभय भिताला ||

हि शिकवण आयुष्यभर त्यांनी अमलात आणली.

           वयोमानपरत्वे आता आपण कीर्तनातून धन संचय करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर दान धर्म हेच व्रत असल्यामुळे, ते केल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे ह्या जाणीवेने त्यांनी पुण्यातील लक्ष्मीरोडवरील ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीचे पेशवाई थाटाचे आपले ऐसपैस घर विकून व जवळील सर्व मौल्यवान वस्तूंच्या विक्रीतून मोठी रक्कम जमा केली व झपाटल्याप्रमाणे स्वत:ला मुलबाळ नसल्यामुळे अनेक संस्थाना आपत्यावत भावनेने योग्यता आणि गरज पाहून लहान-मोठ्या देणग्या देण्याचा सपाटा लावला.
सदाशिव पेठेत एक सदनिका व रोजच्या दैनंदिन उपजीविकेपुर्ता पैसा जवळ ठेऊन बाकी सर्व रक्कम त्यांनी समाजकार्यासाठी  मुक्त हस्त वापरली. वास्तविक गरजू संस्था देणगीसाठी धनवंतांच्या शोधात असतात पण येथे पुष्पलाताबाई सत्पात्र संस्थांच्या शोधात राहत व व्यवहारकुशलतेने एखादी संस्था जसे कार्य करेल तसे तसे एकटीच्या हिमतीवर करत.

           पुढे पुढे त्यांची दान-धर्माची उर्मी एवढी वाढली कि शेवटच्या काळात त्यांना आवर घालावा लागला व जो काही दान धर्म करायचा आहे तो आता इच्छापत्राद्वारे तुमच्या मृतूनंतर करा अशी जाणीव त्यांना द्यावी लागली. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी ह्या उक्ती प्रमाणे आपल्या मृत्यूपत्राद्वारे त्यांनी आपली पै अन पै ची सर्व मालमत्ता कोणताही अपवाद न ठेवता फक्त सामाजिक पुरस्कार व शिष्यवृत्तीसाठीच व्यतीत करावी आशी उत्तम व्यवस्था करून ठेऊन समाजाला एक उद्बोधक आदर्श घालून दिला.